नवी दिल्ली: चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) भारतातही शिरकाव झाला असून, सोमवारी एकाच दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे हे तीनही रुग्ण लहान बालके आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाबाहेर कधीही प्रवास केलेला नाही. देशातील संसर्गाचा चीनमधील उद्रेकाशी संबंध नसल्याचे तसेच श्वसनाशी संबंधित विकारांच्या संभावित साथीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीतून जग सावरलेले असताना या नव्या चिनी विषाणूमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.
सर्वप्रथम सोमवारी सकाळी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ३ महिन्यांची एक मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. ब्रोंकोन्यूमोनिया झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीला बॅपटिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे चाचणीत तिला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच तिला रुग्णालयातून घरीदेखील सोडण्यात आले. ८ महिन्यांचा बालकसुद्धा ब्रोंकोन्यूमोनियामुळे याच रुग्णालयात दाखल असून, त्यालादेखील एचएमपीव्हीचा संसर्ग झाला आहे. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कर्नाटकनंतर गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या एका मुलाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली. सर्दी, तापामुळे गेल्या १५ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या या मुलावर उपचार सुरू आहेत. काही दिवस त्याला व्हेंटिलेटरवरदेखील ठेवण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत तामिळनाडूमध्येदेखील दोन मुलांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले. या दोन्ही मुलांवर दोन स्वतंत्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
एचएमपीव्हीच्या शिरकावानंतर या तीनही राज्यांसोबत इतर राज्यांमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, उच्चस्तरीय बैठका घेऊन नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी बंगळुरूतील रुग्ण हे देशातील एचएमपीव्हीचे पहिले रुग्ण असल्याचे म्हणता येणार नाही, असा दावा केला आहे. देशात या विषाणूचा आधीच संसर्ग झाला आहे. त्याची लागण झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात. हा कोरोनाप्रमाणे भीतीदायक नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. हिवाळ्यात श्वसनाशी संबंधित होणाऱ्या विकारांप्रमाणेच हा आजार आहे, असे राव यांचे म्हणणे आहे. एकीकडे कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र सरकार चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत आहे.
तर दुसरीकडे दिल्ली सरकारने रुग्णालयांना श्वसनाशी संबंधित आजारांच्या रुग्णवाढीसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. चीनमध्ये या विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून, रुग्णालयांमध्ये लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र दर हिवाळ्यात श्वसन विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने घाबरण्याची गरज नाही, असा दावा चीनने केला आहे.
चीनमधील संसर्गाशी संबंध नाही
देशात एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याच्या घटनांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनेदेखील दुजोरा दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले. एचएमपीव्हीचा भारतासह विविध देशांमध्ये आधीच प्रसार झालेला आहे. अनेक देशांमध्ये या विषाणूच्या संसर्गामुळे श्वसनाशी संबंधित आजाराचे रुग्ण आढळत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतात आढळलेल्या रुग्णांचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे देशातील संसर्गाचा चीनमधील या विषाणूच्या उद्रेकाशी काहीही संबंध नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लुएंझा रुग्णांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. देशात सध्या तरी इन्फ्लुएंझासारखा आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली नाही, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. चीनमधील कथित एचएमपीव्ही आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एनसीडीसी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनादेखील चीनमधील स्थितीबाबत अद्ययावत माहिती देत असल्याचे सरकारने सांगितले.
लक्षणे आणि खबरदारी
ह्युमन मेटान्यूमो व्हायरसची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे कोरोना विषाणूच्या संसर्गाप्रमाणेच आहेत. एचएमपीव्ही संसर्ग झाल्यानंतर श्वसनाशी संबंधित विकार होतात. सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव होणे ही एचएमपीव्हीच्या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत. हवेतून तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या विषाणूचा संसर्ग होतो. प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना आणि कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता असलेल्यांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्यानंतर क्वचितच रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. हा एक संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर, हात स्वच्छ धुणे यांसारखी कोरोना महामारीच्या काळातील खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.


