IND vs SA India beat South Africa by 9 wickets: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना विशाखापट्टणम येथे पार पडला. या अंतिम आणि निर्णायक सामन्यात यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनी दारुण पराभव केला. यासह तीन सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली. प्रथम भारतीय संघाने आफ्रिकेला 47. 5 षटकांत 270 धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना 39. 5 षटकांत 1 गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात 358 धावांचा डोंगर उभारूनही भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मालिके जिंकण्यासाठी तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. त्याचबरोर यशस्वी जैस्वालच्या (116*) खेळीने क्विंटन डी कॉकच्या (106) शतकावर पाणी फेरलं. या सामन्यात रोहित शर्मा (75) आणि विराट कोहली (65*) दोघांनीही अर्धशतकं झळकावली.
डी कॉकचे शतक, भारताला 271 धावांचे लक्ष्य –
मालिकेतील सततच्या बॅडलकनंतर या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेचा डाव 270 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉकने उत्कृष्ट फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले आणि 106 धावा केल्या. कर्णधार टेम्बा बावूमाने (48), डेवाल्ड ब्रेविसने (29) आणि मॅथ्यू ब्रीत्ज्केने (24) उपयुक्त योगदान दिले. शेवटी केशव महाराजने 20 धावांची खेळी करत संघाला 270 पर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात 271 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल* या सलामीच्या जोडीने जबरदस्त सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची मोठी भागीदारी रचली. रोहित शर्मा (75) शतकाजवळ असताना झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
यशस्वी जैस्वालने या निर्णायक सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि मालिकेतील मागील दोन्ही सामन्यांमधील अपयश धुऊन काढले. दुसऱ्या बाजूला, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीनेही अर्धशतकी खेळी केली. कोहलीने सलग तिसऱ्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारतीय संघाने हा सामना केवळ 9 गडी राखून जिंकून मालिकेवर कब्जा केला.


