NCP Pune MLC Candidate: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) गेले काही तास सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर अखेर पडदा पडला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पक्षात निर्माण झालेला संभ्रम मिटला असून, पक्षाने ऐनवेळी प्रवेश केलेले विक्रम काकडे यांच्या नावावरच अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. त्यांना पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ देण्यात आला असून, बंडाचा पवित्रा घेणारे सुनील टिंगरे हे त्यांचे डमी उमेदवार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
‘जिजाई’वरील खलबते आणि काकडेंचा पक्षप्रवेश
माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होताच राष्ट्रवादीतील जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. अंतर्गत नाराजीमुळे सकाळी ११ वाजता होणारा काकडेंचा पक्षप्रवेश तब्बल दोन तास लांबणीवर पडला. अखेर ‘जिजाई’ बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी अधिकृतपणे हातात घड्याळ बांधले आणि त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
एकाच वेळी दोन नेत्यांना अर्ज भरण्याचे आदेश; वाढला होता सस्पेन्स!
पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी आणि रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रवादीने एक मोठी खेळी खेळली. विक्रम काकडे यांच्यासोबतच नाराज असलेले ज्येष्ठ नेते सुनील टिंगरे यांनाही अर्ज दाखल करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. त्यातच, पक्षाचे नेते चेतन तुपे यांनी “सुनेत्रा वहिनींच्या आदेशानंतरच एबी फॉर्म कोणाला द्यायचा हे ठरवले जाईल,” असे वक्तव्य केल्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता वाढली होती. एकाच पक्षातून दोन मोठे नेते अर्ज भरणार असल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबतचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत ताणला गेला होता.
अखेर ‘डमी’चा सस्पेन्स संपला
सर्व नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विक्रम काकडे यांनाच पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ सुपूर्द करण्यात आला. पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. “विक्रम काकडे हेच राष्ट्रवादीचे मुख्य आणि अधिकृत उमेदवार आहेत, तर सुनील टिंगरे यांनी पक्षाच्या धोरणानुसार केवळ डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे,” असे स्पष्ट करत पाटील यांनी या राजकीय वादावर अंतिम पडदा टाकला.


