Winter Session: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी अनपेक्षित वातावरण पाहायला मिळाले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून थेट आपल्या पक्षाच्या सरकारवरच ताशेरे ओढत सभागृहात संतापाची झोड उठवली. चर्चा सुरू असताना संबंधित मंत्री उपस्थीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, मंत्री सभागृहात येत नाहीत, तर त्यांच्यावर बिबटे सोडा. हा प्रकार सहन करणार नाही, अशी तीव्र शब्दांत टीका केली. अर्धा तास चर्चा सत्रात बोलण्यासाठी उभे राहिल्यावर मंत्री गायब असल्याचे दिसताच मुनगंटीवार यांनी तालिका अध्यक्षांनाही सुनावले. मंत्र्यांना हजर ठेवणं ही आमदारांची जबाबदारी नाही, ती अध्यक्षांची आहे, असे स्पष्ट करत त्यांनी या निष्काळजीपणामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप केला.
हेही वाचा – Tapovan Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीवर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाकडून तात्पुरती स्थगिती
चंद्रपूरच्या घरकुल योजनेत निधीचा मोठा खोळंबा
यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने’तील रखडलेल्या निधीवरून ते अधिकच आक्रमक झाले. भारत माता माझी आई आहे, पण लाखो गरीबांना डोके टेकायला जागा नाही, अशी भावना व्यक्त करत त्यांनी मुंबईतील कामांसाठी अब्जावधींचा खर्च सहज होतो, पण चंद्रपूरसाठी आवश्यक असलेल्या ९६ कोटी ३६ लाख रुपयांसाठी गरिबांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, यावर कडक शब्दांत प्रशासनावर हल्लाबोल केला. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर बोलताना त्यांनी अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत उडी मारली पाहिजे, असे कठोर विधान करत गैरव्यवस्थापनावर रोष व्यक्त केला.
हेही वाचा – Anna Hazare: कुंभमेळा समाजहिताचा असला तरी झाडे तोडू नका! तपोवन वृक्षतोडीच्या वादात अण्णा हजारेंची उडी
बिरबलाची खिचडी शिजेल, पण निधी नाही
सरकारच्या कारभारावर टीका करताना त्यांनी पारंपरिक म्हणींचा आधार घेत आपल्या नाराजीची तोफ डागली. एक हप्ता मिळाला, की दुसऱ्यासाठी गरिबांना चातक पक्ष्यासारखे आकाशाकडे पाहत राहावे लागते. बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल, पण निधी मात्र येत नाही, अशा शब्दांत त्यांनी केलेल्या टीकेने सभागृहात क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यावर न थांबता त्यांनी अधिकाऱ्यांनी लिहिलेली कागदी उत्तरे वाचू नका, तर निधी कधी मिळणार, हे स्पष्ट सांगा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


