पुणे: निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत त्यात निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले. असे करताच अजित पवार गटाने शरद पवार गटासोबत एकत्र जाण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता अजित पवारांच्या पक्षातील तीन वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याच सांगितलं जात आहे. “मुलाखतीला गेलात तर भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास उमेदवारी विसरा,” असा इशारावजा दम शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवरांना दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शरद पवार पक्षातर्फे मुलाखती सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे आजपासून (18 डिसेंबर) उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत आहेत. 250 हून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून प्रभागात ताकद असलेल्या काहींना अजित पवार गटाकडून थेट संदेश पोहोचवले जात आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या विरोधामुळे पुण्यात दोन्ही गटांचे एकीकरण रखडले आहे. त्यामुळे अजित गटाची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाने यापूर्वी उमेदवारांच्या मुलाखतीचे नियोजन आखले होते. पण भाजपने स्वबळाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मुलाखती स्थगित केल्या.
भाजपमध्ये 22 जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत
भाजपमध्ये विविध पक्षांतील 22 जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मुंबईत आज होणारे पक्षप्रवेश निष्ठावंतांच्या विरोधामुळे लांबणीवर पडले आहेत. भाजप प्रवेश स्पष्ट झाल्यावर नाराजांना आपल्या पक्षात घेण्याची रणनीती अजित गटाने आखली आहे. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास उमेदवारीची गणिते बदलू शकतात, या भीतीनेच अजित पवार गट शरद पवार गटाच्या इच्छुकांना मुलाखती टाळण्यासाठी दबाव टाकत आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या मुलाखतींना किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी गटांत अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवार गटाची ही रणनीती यशस्वी होते की शरद पवार गट स्वबळावर लढतो, हे पाहणं महत्वाचं आहे.


