Satara drugs case : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळील सावरी गावात नुकत्याच सापडलेल्या १४५ कोटी रुपयांच्या ड्रग्स साठ्याच्या प्रकरणात राजकीय वाद चिघळला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हे ड्रग्स सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंची पाठराखण केली. विरोधक शिंदेंचे नाव जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवत असल्याची टीका फडणवीसांनी केली.
फडणवीस म्हणाले, “साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून इतका मोठा ड्रग्स साठा जप्त केला, त्यासाठी मी पोलिस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश झाला आहे. मात्र, या प्रकरणात एकनाथ शिंदेंचे नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आणि निषेधार्ह आहे. आतापर्यंतच्या पुराव्यात शिंदे कुटुंबीयांचा कुठलाही संबंध आढळलेला नाही. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत.”
यावेळी फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, “कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर झाला असून, त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.” मात्र, कोकाटे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याबाबत किंवा अटक वॉरंटबाबत फडणवीसांनी मौन बाळगले.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते, पण त्यांनी खोटा कळवळा दाखवू नये. शिंदेंना संपवण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत, हे सांगण्यास मला भाग पाडू नये. संविधानाचा आदर आहे की नाही, ते सांगा. न्यायव्यवस्था आहे, त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः न्यायाधीश होऊ नयेत.
अन्यथा सगळी न्यायालये बंद करा आणि कार्यालयाबाहेर ‘क्लीन चिट’ची पाटी लावा. मी एकनाथ शिंदेंचा संबंध असल्याचे म्हणत नाही, पण प्रकाश शिंदेंबाबत बोलते. उपमुख्यमंत्रिपदाचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो आणि ते तपास प्रभावित करू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी काही काळ पदापासून दूर राहावे, ही माझी मागणी आहे.”


