Ekvira Devi Karla : महाराष्ट्राची कुलदैवत मानली जाणारी कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी केला आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर, देवीला भाविकांकडून दान मिळालेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचा, तसेच देवस्थानच्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर या गाड्या वैयक्तिक व राजकीय कामांसाठी वापरण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोख रक्कम गोळा केली जात असल्याचा दावा पुजारी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. या सर्व प्रकरणी त्यांनी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, कार्ला परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाविकांमध्येही ट्रस्टच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना आरोपांची अधिकृत माहिती मिळालेली नाही आणि सध्या निवडणुका सुरू असल्याने योग्य वेळी पुराव्यासह माध्यमांसमोर आपली बाजू मांडतील. देवस्थानच्या कारभारावर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हामुळे आता प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


