BJP MLA Death: उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. बरेली जिल्ह्यातील फरीदपूर मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे, कालच (गुरुवारी) त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सर्किट हाऊसमध्ये प्रकृती खालावली
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार डॉ. श्याम बिहारी लाल हे सर्किट हाऊसमध्ये असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वाढदिवसाचा उत्साह ठरला अखेरचा
डॉ. श्याम बिहारी लाल यांचा कालच वाढदिवस होता. त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी काल उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र, अवघ्या २४ तासांच्या आत त्यांच्या निधनाची बातमी आल्याने फरीदपूर मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाहिली श्रद्धांजली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत आमदारांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘बरेली जिल्ह्यातील फरीदपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचे आकस्मिक निधन अत्यंत दुःखद आहे. मी भगवान श्री राम यांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्यावे आणि शोकसंतप्त कुटुंबाला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती!’ डॉ. श्याम बिहारी लाल हे त्यांच्या भागातील एक अभ्यासू आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले असून राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


