पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2026 दरम्यान एक वेगळीच राजकीय आणि प्रशासकीय घडामोड समोर आली आहे. अर्ज छाननीत अपक्ष ठरवण्यात आलेल्या उमेदवाराला थेट राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं हे कसं घडलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयश्री भोंडवे या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र अर्ज छाननीदरम्यान त्यांचा एबी फॉर्म गहाळ असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवलं. या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी आणि इतर तांत्रिक पुरावे सादर केले. हे पुरावे प्रथमदर्शनी विश्वासार्ह वाटल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, चिन्ह वाटपाच्या दिवशीच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीची सुनावणी घेतली. या सुनावणीत जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेत सादर केल्याचे स्पष्ट झाले. याची दखल घेत आयुक्तांनी एबी फॉर्म ग्राह्य धरत जयश्री भोंडवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष म्हणून नाव असतानाही चिन्ह वाटपाच्या यादीत जयश्री भोंडवे या अधिकृत राष्ट्रवादी उमेदवार म्हणून ‘घड्याळ’ चिन्हासह मैदानात उतरल्या आहेत.


