मुंबई : उत्तरेकडून वेगाने वाहणारे थंड वारे महाराष्ट्रात दाखल झाल्याने राज्यभर थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारठा अधिक जाणवत असून काही ठिकाणी थंडीच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज किमान तापमानात चढ-उतार होत गारठा कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्यानुसार पुढील काही दिवसांत तापमानात सतत बदल होत राहणार असून थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतपिकांचे नुकसान होत असून सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांचा धोका देखील वाढत आहे.
दरम्यान, शनिवारी धुळे येथे राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी येथे ६.४ अंश, निफाड येथे ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अहिल्यानगर आणि जेऊर येथे ९ अंशांखाली तापमान घसरले, तर पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथे किमान तापमान १० अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिले.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले डीप डिप्रेशन वादळ सध्या श्रीलंकेच्या त्रिंकोमलीपासून सुमारे ६० किलोमीटर ईशान्येला समुद्रात घोंघावत असून ते वायव्य दिशेने सरकत आहे. हे वादळ आज दक्षिण भारताच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.


