पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात खेडकर कुटुंबाच्या घरी धक्कादायक आणि अजब चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी घरातील नोकराने चोरी केल्याची माहिती फोनवरून चतुःश्रृंगी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे.
खेडकर कुटुंब बाणेर रोडवरील बंगल्यात वास्तव्यास असून, घरात अनेक नोकर कामाला आहेत. यातील एक नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. हाच नोकर या घटनेचा आरोपी असल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला आहे. काल रात्री या नोकराने दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध दिले, ज्यामुळे दोघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर त्याने पूजा खेडकरला बांधून ठेवत घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पलायन केले.
बांधून ठेवलेल्या अवस्थेत पूजा खेडकर यांनी दाराच्या कडीच्या सहाय्याने स्वतःचे हात सोडवले आणि दुसऱ्या फोनवरून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी अद्याप पूजा खेडकर यांनी लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मानसिक धक्का बसल्यामुळे सध्या तक्रार देण्याच्या स्थितीत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. मोबाईलशिवाय आणखी कोणत्या वस्तू चोरीस गेल्या आहेत, याचीही स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त संधी मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने या प्रकरणात प्रथमदर्शनी “मोठा कट” असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत भविष्यातील सर्व परीक्षांवर बंदी घातली आहे. मात्र, पूजा खेडकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.


