Devendra Fadnavis : मराठी माणसाच्या हिताच्या बाता करणाऱ्यांच्या २५ वर्षांच्या सत्तेत मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परप्रांतीयांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वरळीतील बीडीडी चाळ परिसरात नागरिकांशी संवाद साधताना फडणवीसांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
‘मराठी अस्मिता संकुचित नाही’
ठाकरे बंधूंकडून निवडणुकीत ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले की, “मराठी माणूस कधीही संकुचित नव्हता. आम्हाला आमच्या भाषेचा आणि प्रादेशिक अस्मितेचा अभिमान आहेच, पण मराठी माणूस सुरक्षित असण्यासोबतच त्याचे कल्याण होणे महत्त्वाचे आहे. केवळ भेदभाव करून मते मिळवण्याचे राजकारण आता चालणार नाही.”
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना उत्तर
हिंदुत्वाच्या व्याख्येवरून फडणवीसांनी विरोधकांना घेरले. आमचे हिंदुत्व हे केवळ पूजा पद्धतीपुरते मर्यादित किंवा संकुचित नाही. जे प्राचीन भारतीय जीवनपद्धती आणि संस्कृती मानतात, ते सर्व हिंदू आहेत. त्यामुळे मराठी आणि हिंदू यांना वेगळे करणे अशक्य आहे, असे सांगत त्यांनी विकासालाच हिंदुत्वाचा आधार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यातील २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (महायुती) युतीचाच महापौर बसेल. मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती ऐतिहासिक विजय मिळवेल. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक हा ‘प्रीतीसंगम’ नसून पराभवाच्या धास्तीने झालेला ‘भीतीसंगम’ आहे. पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष केवळ आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असल्याची टीकाही त्यांनी केली.


