Digital Arrest Scam: कोंढवा येथील एका महिलेला डिजिटल ॲरेस्टच्या नावाखाली तब्बल ४ कोटी ८२ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी मनी लाँड्रिंगचा बनाव रचून ही फसवणूक केली आहे. १८ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फोन केला. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून विविध राज्यांत बँक खाती उघडली आहेत.
मनी लाँड्रिंगचे व्यवहार
त्यातून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाले आहेत, अशी भीती त्यांना घालण्यात आली. महिलेला तासनतास व्हिडिओ कॉलवर गुंतवून तिला डिजिटल ॲरेस्ट केल्याचा बनाव रचण्यात आला. अटक टाळायची असेल, तर तपासासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी एकूण ४ कोटी ८२ लाख १४ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग करून घेतले.
इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी १९ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.


