Gulbrao Patil : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. माध्यमांना काय दिलं की ते विकतं, याची अचूक नाडी ओळखणारे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी मतदानाचा हक्क आणि लोकशाही यावर भाष्य केलं. “राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही, राजा आता मतपेटीतून जन्माला येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा-बिर्ला असो वा सामान्य माणूस, सर्वांना एक मताचा अधिकार दिला,” असं ते म्हणाले.
मात्र याच भाषणात त्यांनी मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुखांना उद्देशून, “मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा,” असं वादग्रस्त वक्तव्य केलं. हेमा मालिनी यांनाही एक मताचा अधिकार आहे, असं सांगताना केलेल्या या तुलनेवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
एकनाथ खडसेंवर थेट निशाणा
गुलाबराव पाटील यांनी यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केली. मुक्ताईनगरमधील निवडणुकीचा संदर्भ देत, “भाजप आणि शिवसेनेची लढाई असताना राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे भाजपचं काम करत होते, हा कोणता पिक्चर आहे?” असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.
“खडसे माझ्यावर टीका करायचे. मी असा आहे, तसा आहे म्हणायचे. अरे बाबा, मी निवडून आलो आहे. तुम्ही आम्हाला त्रास दिला, जेलमध्ये टाकलं, आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला, जिल्ह्यात सगळ्यांना हैराण केलं. म्हणूनच आज तुम्हाला हे भोगावं लागतंय,” असा खरपूस समाचार त्यांनी घेतला. माजी मंत्र्यांसोबत आता बॅग पकडायलाही कोणी राहत नाही, असा बोचरा टोला देखील त्यांनी लगावला.
इम्तियाज जलील यांना सल्ला, संजय राऊतांवर टीका
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र हिरवागार करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “कोणी म्हटलं म्हणून महाराष्ट्र हिरवागार किंवा पिवळागार होत नसतो. अशा वक्तव्यांना काही अर्थ नाही. अशा गोष्टी बोलून महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, हाच माझा सल्ला आहे.”
यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “संजय राऊतांना काय माहिती कोण सासरा आणि कोण सून आहे ते. त्यांच्या बोलण्यापुरतंच सगळं मर्यादित आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही दुसऱ्या क्रमांकाचा परफॉर्मन्स केला आहे, हेही त्यांना माहिती नाही,” असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
गुलाबराव पाटलांच्या या एकामागोमाग एक वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, त्यांच्या विधानांवरून नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.


