Harshvardhan Patil on Ajit Pawar : सत्ता ही सामान्य जनतेसाठी राबवायची असते, हे सूत्र दादांनी आयुष्यभर पाळले. पहाटे ६ वाजल्यापासून जनतेसाठी काम करणारा असा लोकनेता जगात दुसरा होणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना पाटील कमालीचे भावूक झाले होते.
भाषणात हर्षवर्धन पाटलांचे डोळे पाणावले
पवार कुटुंबावर कोसळलेल्या या संकटाचा उल्लेख करताना हर्षवर्धन पाटील यांचा कंठ दाटून आला. “पवार साहेबांनी या वयात काय करायचे? सुनेत्रावहिनी, पार्थ, रोहित आणि सुप्रियाताईंना आता कोणाचा आधार आहे?” असे विचारताना पाटील यांचे डोळे पाणावले. त्यांनी काही काळ थांबून स्वतःला सावरले आणि पुन्हा भाषणास सुरुवात केली. अजितदादांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकत्रीकरणासाठी झाल्या होत्या ६ बैठका
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकत्र यावे, ही दादांची गेल्या महिनाभरापासूनची तीव्र इच्छा होती, असा महत्त्वपूर्ण खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला. या संदर्भात झालेल्या ६ गुप्त बैठकांना मी स्वतः उपस्थित होतो, असेही त्यांनी सांगितले. “हर्षवर्धन… आता संघर्ष नको, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन काम करावे,” असे दादांनी वारंवार बोलून दाखवले होते. यासंदर्भात पवार साहेबांचीही भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
“हर्षवर्धन, मी तुमच्या घरी जेवायला येतोय…”
गेल्या १८ तारखेला अजितदादांचा अचानक फोन आला आणि त्यांनी ‘मी जेवायला येतोय’ असे सांगितले, अशी आठवण पाटील यांनी सांगितली. त्यावेळी दादा एकटेच घरी आले आणि तासभर मनसोक्त गप्पा मारल्या. “मनामध्ये काही ठेवू नका,” असे दादांनी त्यांना आवर्जून सांगितले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत निवडणूक आराखड्यावर चर्चा झाली होती. इतक्या मोठ्या उंचीचा माणूस पुन्हा होणे शक्य नाही, अशा शब्दांत त्यांनी दादांच्या मोठेपणाचे वर्णन केले.
विमान अपघाताच्या आदल्या दिवशीही झाले होते बोलणे
विमान अपघाताच्या आदल्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी सकाळी ७:३० वाजता दादांचा मुंबईवरून फोन आला होता. जवळपास २० मिनिटे आमची सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर कॅबिनेट बैठकीला जाईपर्यंत ते फोनवर बोलत होते. बुधवारी (दि. २८) इंदापूर तालुक्यात त्यांची सभा घेण्याची तीव्र इच्छा होती, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.
पवार कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
“पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र काम करावे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे पाटील म्हणाले. संकटाच्या या काळात सर्व कार्यकर्त्यांनी संयम राखून आणि पूर्ण ताकदीनिशी पवार कुटुंबाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.


