Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून, ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसाने हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कधी थंडी, कधी उकाडा तर कधी पाऊस अशी स्थिती सध्या राज्यभर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तब्बल 8 जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक
या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली असून, पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
राज्यात थंडी गायब, उकाडा वाढला
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये कडाक्याची थंडी जाणवत असली, तरी महाराष्ट्रात थंडी जवळपास गायब झाली आहे. डिसेंबर महिन्यातच थंडीचा जोर जाणवला, मात्र त्यानंतर तापमानात सातत्याने चढउतार होत आहेत.
1 जानेवारीला झालेल्या पावसानंतर राज्यातील हवामान पूर्णपणे बदलले आहे. फेब्रुवारी महिन्यात फारशी थंडी जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने आधीच दिला होता.
पुण्यात ‘तीन ऋतूंचा’ अनुभव
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. सध्या किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
सकाळी आणि रात्री थंडी जाणवत असली, तरी दुपारी कडक ऊन आणि उकाडा, तर संध्याकाळी ढगाळ वातावरण असल्याने पुणेकरांना एकाच दिवसात तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच ऐन फेब्रुवारीत पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.


