Pmc Election : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून, महापौरपदासाठीची आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. मात्र, अनेक महापालिकांमध्ये महापौरपदावरून अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, आज महापौरपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजप-शिंदे गटाचा राज्यभर दमदार विजय
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युतीत मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुका भाजप-शिंदे गटाने युती म्हणून लढवल्या होत्या आणि त्याचा फायदा थेट निकालात दिसून आला.
अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिंदे गटापासून फारकत घेत शरद पवार गटासोबत निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.
निवडणुकांनंतर मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे.
पुणे महापालिकेत महापौरपदासाठी रस्सीखेच
पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपामध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपाकडून तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आज अर्ज दाखल करण्यापूर्वी अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ही तीन नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपाचे संख्याबळ भक्कम
पुणे महापालिकेत भाजपाने 119 जागांवर विजय मिळवला असून, भाजपाचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपातील इच्छुक महिला नगरसेवकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले होते. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
या तीन नावांची चर्चा
भाजपाकडून महापौरपदासाठी पुढील तीन महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत. वर्षा तापकीर (खडकवासला मतदारसंघ), मंजुषा नागपुरे (खडकवासला मतदारसंघ), मानसी देशपांडे (पर्वती मतदारसंघ) यापैकी एका नावावर आज अंतिम शिक्का बसण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये रवी लांडगे फायनल
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या महापौरपदासाठी रवी लांडगे यांचे नाव अंतिम करण्यात आले असून, त्यांनी अर्जही दाखल केला आहे. रवी लांडगे हे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.


