Anjali Damania : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पार्थ पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांसह जोरदार हल्ला चढवला आहे. “पार्थ पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची या प्रकरणातून सुटका होणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
चौकशी समितीलाच दिला इशारा
पत्रकार परिषदेत दमानिया यांनी थेट ‘पॉवर ऑफ अटर्नी’ची प्रत प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. त्यांनी म्हटलं की, शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या व्यवहाराच्या कागदपत्रांवर स्वतः पार्थ पवारांचे नाव, फोटो आणि स्वाक्षऱ्या असल्याचा दावा दमानिया यांनी केला. जर खारगे समितीने या ठोस पुराव्यांकडे कानाडोळा करून पार्थ पवारांना निर्दोष ठरवले, तर आपण ही लढाई थेट मुंबई उच्च न्यायालयात घेऊन जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशयाचे वादळ
जमीन घोटाळ्याच्या आरोपांसोबतच दमानिया यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “एखादा पाळीव प्राणी गेल्यावरही माणूस हळहळतो, पण येथे पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नाही,” असे म्हणत त्यांनी या नेत्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला. हे सर्व नेते इतक्या घाईत कामाला कसे लागले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


