मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी दिलासादायक आणि शिक्षक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात तब्बल ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून साकारलेल्या पिल्लई विद्यापीठ, नवी मुंबई यांच्या भव्य उद्घाटनप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांबाबत महत्त्वाची माहिती दिली.
११ हजार रिक्त जागांपैकी ५,५०० पदे भरणार
राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे ११ हजार प्राध्यापक पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी पहिल्या टप्प्यात ५,५०० पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाणार असून, अनेक वर्षांपासून रखडलेली प्राध्यापक भरती अखेर मार्गी लागणार आहे.
विद्यापीठ कॅम्पसमध्येही ७०० प्राध्यापक भरती
केवळ संलग्न महाविद्यालयेच नव्हे, तर राज्यातील विद्यापीठ कॅम्पसमध्येही सुमारे ७०० प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे संशोधन, अध्यापन आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होणार
या निर्णयामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे अडचणीत असलेली व्यवस्था आता सावरणार, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
राज्यात ७० हजार पदांची मोठी नोकरभरती
दरम्यान, राज्यातील तरुणांसाठी आणखी एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. राज्यात लवकरच तब्बल ७० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २० हजार पदे, राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. या भरतीमुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
तरुणांसाठी मोठी संधी
प्राध्यापक भरतीसह राज्यातील मोठ्या प्रमाणावर होणारी नोकरभरती ही तरुणांसाठी मोठी संधी मानली जात आहे. आगामी काळात भरती प्रक्रियेची जाहिरात, पात्रता आणि परीक्षा पद्धतीबाबत सविस्तर माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.


