Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोहिम विजेतेपदाची; हे होणारच होते

मोहिम विजेतेपदाची; हे होणारच होते

अष्टपैलू: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार हे निश्चित होते. क्रिकेट, क्रिकेटपटू आणि प्रशासक यांना चर्चेच कसे राहायचे हे चांगले ठाऊक आहे. यामुळेच अलिकडच्या काळात हे सातत्याने घडत आहे. आतापर्यंत भारताच्या भूमिकेवरुन वाद होत होते. या वेळी पाकिस्तानच्या भूमिकेने वादाला सुरुवात झाली इतकाच काय तो यामधील फरक. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्याचे पूर्वीपासून एक वेगळेच आकर्षण असायचे. अलिकडच्या काळात हे आकर्षण अधिक वाढू लागले होते. कारण, देशांतर्गत तणावग्रस्त परिस्थितीमुळे हे दोन्ही संघ कायम फक्त आयसीसीच्याच स्पर्धेत समोरासमोर येतात. अर्थात, आयसीसीच्या वतीने प्रत्येकवेळेस या दोन्ही संघांना एकाच गटात आणले जाते आणि ते का हे आता वेगळे सांगायची गरज नाही. या सामन्याने सगळ्यांचेच उखळ पांढरे होत असते.

केवळ आयसीसीच नाही, तर या सामन्यावर अनेक व्यावसायिक गणिते अवलंबून असतात. या एका सामन्यातून आयसीसीला सर्वाधिक महसूल मिळतो. प्रसारण हक्क खरेदी करणारी कंपनी देखिल या सामन्यातून आपले पैसे दुप्पट, चौपट वसूल करत असते. अन्य सामन्या दरम्यान असलेला जाहिरातीचा दर या सामन्यासाठी चौपट वाढललेला असतो. तरी देखिल जाहिरात कंपन्या आनंदाने तो खर्च करतात. सामन्याची तारीख जाहीर झाली की तिकिट विक्री सुरु होण्याचा अवकाश सर्व तिकिटे हातोहात संपतात. मैदानावरील जाहिरातीचे दर देखिल वाढलेले असतात. इतकेच नाही, तर हा सामना होत असलेल्या शहरातील हॉटेलचे दर देखिल आभाळाला पोहचतात. शहरात पोहचण्यासाठी विमानाचे दर देखिल गगनाला भिडतात. आजचेच उदाहरण बघा, भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याविषयी अनिश्चितता असे पर्यंत श्रीलंकेला जाणाऱ्या विमान प्रवासाचा दर साधारण १० हजार असा होता. मात्र, हा सामना होणार म्हटल्यावर विविध मार्गावरील दर किमान ७० हजार, तर कमाल एक लाख रुपयापर्यंत वाढले आहेत. हॉटेल्सचे दराचे विचारुच नका. श्रीलंकेतील आर्थिक उलाढाल यामुळे वाढणार आहे. त्यांच्या अर्थकारणाला एका दिवसातच हात मिळणार आहे. उगाच नाही श्रीलंका क्रिकेट मंडळाने हा सामना होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची मनधरणी केली.

असो, या वेळी पडद्यामागे काय घडले याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. एवढा मोठा निर्णय झाला म्हणजे काही तरी देवाण घेवाण निश्चित झाली असणार. त्याशिवाय तोडगा निघूच शकला नसता. आयसीसीने मध्यस्थ म्हणून पाठवलेल्या इम्रान ख्वाजा यांनी केलेली मुत्सदेगिरी फळाला आली हे कोणीच नाकारणार नाही. मध्यस्थीसाठी त्यांचीच निवड करणे यापासून आयसीसीच्या रणनितीची कल्पना येते. आयसीसीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या मताला महत्व आहे. अनेकदा त्यांचा सल्ला मार्गदर्शक ठरतो असे आयसीसीच्या वतीनेच सांगण्यात आले. पाकिस्तानला बहिष्कारापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिराती तसेच श्रीलंका क्रिकेट मंडळाची मोट बांधली. बांगलादेशला वगळल्यामुळे पाकिस्तानने बहिष्काराचा मुद्दा लावून धरला. पण, त्याच बांगलादेशने त्यांना क्रिकेटच्या हितासाठी बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. याची पावती त्यांना मिळाली. बांगलादेशवर अपेक्षित असणारी दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २०३१मधील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांचा संयोजन अधिकार कायम ठेवण्यात आला. तसेच त्यापूर्वी आणखी एक आयसीसीची स्पर्धा (अंदाजानुसार कुमार विश्वचषक) बांगलादेशात घेण्याचे वचन त्यांना मिळाले. पाकिस्तानला काहीच मिळाले नाही, असे होणार नाही. पण, येथेही आयसीसीने आपली बाजू स्पष्ट केली. तुम्हाला सवलती मिळतील, पण त्या कोणत्या हे विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर जाहीर करु असे सांगितले. हे असे सगळे पडद्यामागचे नाट्य होते. नाटकच ते कारण शेवटी सामना तर होणारच होता.

या सगळया चर्चेच्या पार्श्वभूमीवर मैदानाला कसे विसरता येईल. दोन दिवसांपूर्वी म्हटल्या प्रमाणे न्यूझीलंडचे टिम सैफर्ट आणि फिन अॅलन हे या अतिजलद क्रिकेटमदील आय़डीयल फलंदाज आहेत. पहिल्या सामन्यात सैफर्टने झलक दाखवलीच होता. दुसऱ्या विजयात सैफर्टला अॅलन येऊन मिळाला. या दोघांनी संयुक्त अरब अमिरातीने ठेवलेले १७३ धावांचे आव्हान १५ षटकांतच पार केले. न्यूझीलंडचा एकही गडी बाद झाला नाही. अर्थात, न्यूझीलंडला आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. दोन विजयानंतर त्यांचा बाद फेरीचा मार्ग मोकळा आहे. कारण त्यांच्या शिल्लक दोन सामन्यापैकी एका सामन्यात त्यांच्यासमोर कॅनडाचे दुबळे आव्हान असेल.दुसरा सामना मात्र त्यांना दक्षिण आफ्रिकेशी खेळायचा आहे. हा सामना या गटाची क्रमवारी निश्चित करणारा ठरणार आहे. यासाठीच न्यूझीलंडने आता गोलंदाजीबाबत नियोजन करण्याची वेळ आली आहे.

अन्य एका सामन्यात नेदरलॅण्ड्स संघाने नवख्या नामिबिया संघाला हरवून आपले आव्हान राखले. नामिबियाच्या बहुतेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण, त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात आले नाही. त्यांच्या तुलनेत अनुभवी असलेल्या नेदरलॅण्ड्सने याच आघाडीवर त्यांच्यावर मात केली. डी लीडे याने आपले अष्टपैलूत्व सिद्ध करताना आपली छाप निश्चित सोडली. या दोन्ही संघांना आयसीसी स्पर्धेव्यतिरिक्त खेळण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर त्यांना आपले क्रिकेट वाढवणे आवश्यक आहे. परदेशी क्रिकेटपटूंवर अवलंबून राहतानाच आपले खेळाडू तयार करण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे आणि त्यासाठी त्यांना आयसीसीकडून पुरेसे पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे.

भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय झाल्यानंतर चोविस तासांनी पाकिस्तान दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरले. गेल्या विश्वचषक स्पर्धेत ज्या संघाकडून पराभव पत्करावा लागला, त्या अमेरिकेविरुद्ध त्यांचा सामना होता. साहिमजादा फरहीन, बाबर आझम यांनी फलंदाजीत कमाल केल्यावर शादाब खान, उस्मान तारिक यांनी गोलंदाजीत आपली लय दाखवून दिली. पाकिस्तानच्या विजयात या फिरकी गोलंदाजांचा निश्चित वाटा राहिला. अमेरिकेकडून गेल्या विश्वचषक स्पर्धेतली पराभवाचा त्यांनी वचपा घेतला. अमेरिकेकडून खेळणाऱ्या अर्धा पुणेकर आणि अर्धा मुंबईकर असलेल्या शुभम रांजणे याने अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानने दोन विजय मिळवून आपला बाद फेरीतील प्रवेश सुकर केला आहे. पण, त्यांच्यासाठी खरा सामना रविवारी भारताविरुद्ध असेल. हा सामना दोन्ही संघांपेक्षा त्यांच्या चाहत्यांसाठी महत्वाचा असतो. विश्वचषक हरला तरी चालेल, पाकिस्तानला हरवले की विश्वचषक जिंकल्यासारखीच चाहत्यांची भावना असते. मैदानावर जेवढा हा सामना ज्या तीव्रतेने खेळला जातो, त्यापेक्षा अधिक तीव्रता मैदानाबाहेर अधिक असते. चला, आता या सामन्याची प्रतिक्षा करुयात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!