Donald Trump on Mojtaba Khamenei : अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची नव्या सर्वोच्च नेत्यपदी नियुक्ती करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोजतबा खामेनी यांच्या जीवितपणाबाबत सनसनाटी दावा केला आहे. एनबीसी न्यूजशी फोनवर बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी ऐकतोय की तो जिवंत नाही. आतापर्यंत कोणीही त्याला दाखवलेलं नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, “जर तो जिवंत असेल तर त्याने आपल्या देशासाठी खूप स्मार्ट काम करावे, म्हणजे शरण यावे.” ट्रम्प यांनी इराण आता तडजोडीची भाषा करत असल्याचे सांगितले, पण अमेरिका कोणत्याही अटींवर तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेने ‘रिवॉर्ड्स फॉर जस्टिस’ कार्यक्रमांतर्गत मोजतबा खामेनी आणि इराणच्या ९ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यास १० मिलियन डॉलर्स बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचीही ऑफर देण्यात आली आहे. हे पाऊल २८ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर उचलले गेले असून, इराणवर मानसिक दबाव टाकणे आणि अंतर्गत यंत्रणा कमकुवत करणे हा यामागचा उद्देश असल्याचे मानले जाते.
मोजतबा खामेनी कोण आहेत?
मोजतबा खामेनी हे अयातुल्ला अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. ते कट्टरपंथी विचारसरणीचे आणि प्रभावशाली रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. १९८० च्या दशकातील इराण-इराक युद्धात त्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. इराणच्या क्रांतिकारी गार्ड्स वर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. २०१९ मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे इराणकडून काय प्रतिसाद येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या इराणचे नवे नेते मोजतबा खामेनी सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत, ज्यामुळे अफवा आणि संशय वाढले आहेत.


