Rohini Khadse : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे सुरू झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि सत्ताधारी आमदारांवर ताशेरे ओढले आहेत.
रोहिणी खडसे यांनी म्हटले की, “सत्ताधारी आमदार असल्याने त्यांना स्वयंपाकाच्या गॅसचे खरे महत्त्व कळत नसावे. म्हणूनच अशी बेलगाम वक्तव्ये केली जात आहेत.” त्यांनी विशेषतः भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या “२५ दिवसांत गॅस सिलेंडर मिळेल” या विधानावर उपरोधिक हल्ला केला. “वि’चित्रा’ ताई, जर सामान्य गृहिणीचा गॅस संपला तर तिने २५ दिवस वाट पाहायची का? गॅस येईपर्यंत आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
उज्वला योजनेवर ठपका
केंद्र सरकारने उज्वला योजनेचा मोठा गाजावाजा करून महिलांना स्वतंत्र गॅस कनेक्शन दिल्याचा दावा केला होता. मात्र, आता इराण युद्धामुळे आयात प्रभावित झाल्याने योजना कुचकामी ठरली आहे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. “सरकारच्या ढिसाळ कारभाराने महिलांना पुन्हा चुलीपुढे बसून अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. प्रसिद्धीचा हव्यास सोडून तातडीने गॅस उपलब्ध करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
रोहिणी खडसे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे: “गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू.” मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये हॉटेल्स आणि खानावळी बंद होत असल्याने व्यावसायिक क्षेत्रही प्रभावित झाले आहे.
देशभरात गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असून, सरकार घरगुती पुरवठ्यास प्राधान्य देत व्यावसायिक क्षेत्राला मर्यादा घातल्या आहेत. मात्र, विरोधकांकडून याला केंद्राच्या नियोजनातील अपयश म्हणून सादर केले जात आहे. रोहिणी खडसेंच्या या टीकेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.


