Pune Accident News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मांढरदेवी मार्गावर आंबाडे गावाच्या हद्दीत रात्री एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून थेट १० फूट खाली असलेल्या घरासमोरील कठड्याला जाऊन धडकली.
अपघात कसा घडला?
रात्रीच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्यावरून खाली कोसळून घरासमोरील कठड्यावर आदळली. सुदैवाने कारमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने दोघा प्रवाशांचे जीव वाचले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कारमधील दोघे जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांनी त्वरित मदत केली.
स्थानिकांच्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालक दारूच्या नशेत असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण आणि नशेची पुष्टी होईल.
भोर-मांढरदेवी मार्ग हा घाटरस्ता असल्याने वळणे तीव्र आणि रात्री प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. स्थानिक पोलिसांनी अपघातग्रस्त ठिकाणी तपास सुरू केला असून, अधिक माहिती येत आहे. रस्ते सुरक्षिततेसाठी चालकांनी वेग नियंत्रित ठेवावा आणि रात्री प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


