Baramati By Election : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पोटनिवडणूक जाहीर होताच सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून उमेदवार असतील, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षाकडून बारामतीची पोटनिवडणूक लढवली जाणार नसल्याची चर्चा सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “आम्ही बारामतीची जागा लढणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबत मी आधीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच महाविकास आघाडीकडूनही या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा विचार नाही.”
लक्ष्मण हाके यांचे नाव चर्चेत
दरम्यान, बारामती पोटनिवडणूक लक्ष्मण हाके यांनी लढवावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. समर्थकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी लक्ष्मण हाके यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवार यांचे नाव देण्यात आल्याने काही समर्थक नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून धनगर समाजात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. त्यातील एक गट या मुद्द्यावर पोटनिवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
बारामती पोटनिवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 9 एप्रिल 2026
मतदान : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : 6 मे 2026


