पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (10 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सर्वांचे लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबतही अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणा केली. यामध्ये पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा पवार यांनी केली.
राज्यातील पुढील पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे एकूण चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामधील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने पूर्ण होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे, अजित यांनी सांगितले.
तसेच मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे.


