Junnar Rain News : राज्यात मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने मोठा हाहाकार उडवला आहे. कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रस्ते, नाले आणि ओढ्यांना अचानक पूर आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ओढ्यांना नद्यांचे स्वरूप आले असून शेतजमिनी आणि रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, राज्यातील इतर भागांमध्येही मान्सून सक्रिय होत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ ते ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे गळमोडी नदीला पूर आला असून नांदगाव-शिऊर महामार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जालना शहरातही मेघगर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावली असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातही दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास शेती आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


