Pune Crime : सोशल मीडियावर रील्स आणि फोटोच्या माध्यमातून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या कुख्यात डीलरला पुणे पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद (रा. बिबवेवाडी, पुणे) याला पुणे गुन्हे शाखेने लातूर जिल्ह्यात सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू इंस्टाग्रामवर पिस्तुलांसोबत फोटो पोस्ट करून त्याच्या माध्यमातून अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री करत होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. तो पिस्तूल आणि काडतुसे यांचा व्यवहार इंस्टाग्रामद्वारेच करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
पुण्यातील पर्वती, खडक आणि वाघोली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव आधीपासूनच संशयित म्हणून समोर आले होते. अनेक गोळीबार घटनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल बबलूने पुरवले असल्याचा संशयही पोलिसांना होता.
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला तो लातूरमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मध्यप्रदेशातील उमरठी गावातील शस्त्र विक्रेत्यांशी संपर्क ठेवून गावठी पिस्तुलांची खरेदी करत असल्याचेही उघड झाले आहे. तसेच तो आपल्या ओळखीच्या लोकांना मध्यस्थ म्हणून वापरत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून ५ गावठी पिस्तुले आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली असून त्याची एकूण किंमत सुमारे १ लाख ९८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या आरोपीचा पुढील तपास सुरू असून त्याने आणखी कोणाला शस्त्रे पुरवली आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.


