Pune Crime News : पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. विशेष म्हणजे, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी परिसरातील एच विकास स्टील या कंपनीच्या कार्यालयाला लक्ष्य करत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालय परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचा उल्लेख करण्यात आला आहे. “आम्ही अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आमच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला,” असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना पुढील वेळी अधिक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा स्वरूपाची धमकीही देण्यात आली आहे.
या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोंकार आणि टायसन बिश्नोई या नावांचा उल्लेख असून त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि या घटनेमागे खरोखरच लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात आहे का, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून घडला, याचा सर्व अंगांनी तपास केला जात आहे.
या घटनेमुळे पुण्यातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


