Coaching Centre Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीगंज परिसरात सोमवारी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर आणि वाचनालय सुरू होते. तळमजल्यावर पाळीव प्राण्यांचे दुकान, तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन कार्यरत होता. सोमवारी अचानक इमारतीला आग लागल्यानंतर काही क्षणांतच धूर आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली. त्यामुळे आत अडकलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जीव वाचवण्यासाठी काही जणांनी बाल्कनी आणि छताचा आधार घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, धुरामुळे गुदमरून १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
जखमींना तातडीने केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. आग लागण्यामागील कारणांचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या घटनेमुळे शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


