Maharashtra IAS Transfer List : राज्य सरकारने पुन्हा एकदा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या आदेशानुसार चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या करण्यात आल्या असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), अन्न व नागरी पुरवठा विभाग, महापारेषण आणि जलसंपदा विभागातील महत्त्वाच्या पदांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आयएएस अधिकारी पी. वेलरासू यांच्या बदलीची होत आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांची आता एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी १६ जून रोजीच्या आदेशात त्यांच्या नियुक्तीबाबत वेगळी तरतूद करण्यात आली होती.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांची मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे महापारेषणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जळगाव येथील तापी सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर यांची जलसंपदा विभागात सचिव (प्रकल्प समन्वय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी बीएमसीच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या एमएमआरडीएमधील बदलीला राज्य सरकारने स्थगिती दिली होती. निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नियुक्त होणाऱ्या आयएएस अधिकारी प्राजक्ता वर्मा यांनाही अद्याप नवीन पदभार मिळालेला नाही.
याआधी अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर विजय सिंघल यांच्याकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेलरासू यांच्या नियुक्तीनंतर एमएमआरडीएमधील काही वरिष्ठ पदे अद्याप रिक्त असून, पुढील काही दिवसांत आणखी बदल्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


