Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
राजीनाम्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही खरात पती-पत्नीला अध्यात्मिक दृष्टीकोनातून गुरु मानलं होतं. त्यांच्याशी संबंध हा केवळ धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपुरता होता,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, काही वर्षांपूर्वीचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत, मात्र त्या काळात खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.
“कोणत्याही व्यक्तीला आपण गुरु मानतो, पण पुढे जाऊन त्याचं वर्तन कसं असेल, याची कल्पना नसते. खरातच्या कृत्यांबद्दल समजल्यावर मला मोठा धक्का बसला,” असे त्या म्हणाल्या. तसेच, या प्रकरणात निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा, यासाठी त्यांनी स्वतः पोलीस महासंचालकांना पत्र दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
चाकणकर यांनी पुढे सांगितले की, “जे काही घडलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि घृणास्पद आहे. अशा कृत्याचं आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही.” त्यांनी पोलिसांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणीही केली.
“माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. मात्र, एक महिला म्हणून माझ्यावरच आरोप करण्यात येत असल्याचं वाईट वाटतं,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासातून आणखी काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


