इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निमगाव-केकती परिसरात चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या वीज लोड शेडिंगमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, निमगांव परिसरातील वीज वितरण व्यवस्थेत मागील काही दिवसांपासून वारंवार खंड पडत असून, दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा बंद होत आहे. यामुळे घरगुती वापरासोबतच शेतकरी, लघुउद्योग, दूध उत्पादक व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोड शेडिंगमुळे पाणीपुरवठा व इतर अत्यावश्यक सेवा विस्कळीत होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी सांगितले की, वीज वितरणाचे नियोजन चुकीच्या पद्धतीने होत असून त्याचा थेट परिणाम गावातील सर्वसामान्य जनतेवर होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करावे व लोड शेडिंगचे वेळापत्रक स्पष्टपणे जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


