LPG Gas Booking Rules : घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. LPG सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता दोन बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आले आहे. यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
नवीन नियमांनुसार, डबल-सिलिंडर कनेक्शन असलेल्या ग्राहकांना आता पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी ३५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती. गॅस कंपन्यांनी काळाबाजार रोखणे आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ही मुदत आणखी वाढवून ४५ दिवस करण्यात आली आहे. तर ज्या ग्राहकांकडे सिंगल सिलिंडर कनेक्शन आहे, ते २५ दिवसांनंतर पुढील बुकिंग करू शकतात.
या नियमातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे बुकिंगची पात्रता आता मागील बुकिंगच्या तारखेऐवजी सिलिंडर डिलिव्हरीच्या तारखेवर आधारित असेल. त्यामुळे ग्राहकांनी डिलिव्हरीची तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जर ग्राहकांनी निर्धारित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती विनंती प्रणालीद्वारे आपोआप नाकारली जाईल. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी संबंधित गॅस कंपनीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बदलांमुळे घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये, विशेषतः गृहिणींमध्ये, चिंता व्यक्त केली जात आहे.


