Pune Agriculture College Death: पुण्यातील नामांकित कृषी महाविद्यालयाच्या परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. महाविद्यालयाच्या ‘मेस’मधील जलशुद्धीकरण यंत्राचा (RO) तीव्र विद्युत धक्का लागल्याने एका 23 वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय 23, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य हा कृषी महाविद्यालयात ‘ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट’ (ABM) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. 14 मार्च रोजी तो मेसमधील जलशुद्धीकरण यंत्राची तपासणी करत असताना, अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का इतका भीषण होता की चैतन्य जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली.
विद्यार्थ्यांचा संताप आणि प्रशासनावर आरोप
या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मेसमधील उपकरणांची वेळेवर देखभाल न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. “सुरक्षा उपायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे,” असा आरोप करत संतप्त विद्यार्थ्यांनी केला. संपूर्ण महाविद्यालय परिसराचे तातडीने ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करण्यात यावे. या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
कुलगुरूंची प्रतिक्रिया आणि चौकशी समिती
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “चैतन्यला वाचवण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण यश आले नाही. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सुविधांमधील त्रुटी तपासून आपला अहवाल सादर करेल.”


