Pune PMP Bus: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) आता कंबर कसली आहे. प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची किंवा सुट्या पैशांची कसरत करावी लागू नये, यासाठी ‘आपली PMPML’ (Aapli PMPML) या अॅपच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
आता बसच्या सीटवरच मिळणार क्यूआर कोड
प्रवाशांना अॅप वापरणे अधिक सोपे व्हावे, यासाठी प्रशासनाने कल्पक योजना आखली आहे. आता केवळ बस स्टॉपवरच नाही, तर बसच्या आत, प्रवाशांच्या सीट शेजारी आणि बाहेरच्या पॅनेलवरही क्यूआर कोड (QR Code) लावले जाणार आहेत. हे कोड स्कॅन करून प्रवासी तत्काळ तिकीट बुक करू शकतील. यामुळे प्रवाशांना कंडक्टरची वाट न पाहता आपला प्रवास अधिक सुखकर करता येईल.
प्रवाशांच्या वेळेची होणार बचत; ही आहेत प्रमुख वैशिष्ट्ये:
- रिअल टाइम लोकेशन: बस नेमकी कुठे आहे आणि तुमच्या थांब्यावर किती वेळात येईल, याची अचूक माहिती (Live Tracking) मिळते.
- वेळापत्रकाची सोय: मार्गांची माहिती आणि वेळापत्रक हाताशी असल्याने प्रवासाचे नियोजन घरबसल्या करता येते.
- डिजिटल तिकीट: रांगेत उभे राहण्याची गरज नाही, थेट मोबाईलवरून तिकीट बुकिंगची सुविधा.
- नव्या प्रवाशांना मार्गदर्शक: शहरात नवीन असलेल्या व्यक्तींना बस मार्ग शोधणे अॅपमुळे सोपे झाले आहे.
पुणेकरांना आवाहन
सध्या अॅप वापरकर्त्यांची संख्या मोठी असली तरी, एकूण प्रवाशांच्या तुलनेत ती वाढवण्याची गरज प्रशासनाला वाटते. एप्रिल महिन्यातील या मोहिमेमुळे पुणेकरांचा वेळ वाचेल आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान व पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


