पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनाला आज 2 महिने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली असून, दादांच्या आठवणीत त्यांचे डोळे पाणावले आहेत. “काळ पुढे सरकत असला, तरी मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलेले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
‘तुमचे विचारच आता आमचे मार्गदर्शक’
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, दैनंदिन राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना दादांचे अस्तित्व पावलोपावली जाणवते. “राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळताना किंवा महत्त्वाचे राजकीय निर्णय घेताना, अशा परिस्थितीत दादांनी काय भूमिका घेतली असती, याचा विचार करूनच मी पुढचे पाऊल टाकत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दादांनी घालून दिलेला वस्तूपाठ आणि त्यांची कार्यपद्धती आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आधारस्तंभ हरपल्याची भावना
अजित दादा केवळ एक नेते नव्हते, तर सर्वसामान्यांसाठी ते एक भक्कम आधारस्तंभ होते, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. कामासाठी असलेली त्यांची झपाटलेली वृत्ती आणि दूरदृष्टी कायम प्रेरणा देत राहील. सामान्य जनतेशी असलेले त्यांचे नाते आणि लोकाभिमुख कार्य हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली रिक्त जागा कधीही भरून येणार नाही, ही जाणीव मनाला सतत सलत राहते, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
वारसा पुढे नेण्याचा निर्धार
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि दादांनी दिलेली शिकवण हाच आता पुढच्या प्रवासासाठी प्रकाशदीप असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. “तुमची स्वप्ने आणि तुमचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार मी मनोमन केला आहे. तुमच्या आठवणी आणि मूल्ये हीच आमची ऊर्जा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला आणि जोडीदाराला आदरांजली वाहिली आहे.


