Pune News : पुण्यात सोशल मीडियावर स्वतःला ‘रीलस्टार’ म्हणवणाऱ्या संतोष पंडित याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक रस्त्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा आणि अश्लील भाषेत टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार घटनास्थळी गेल्या होत्या. याच वेळी संतोष पंडित तिथे आला आणि अचानक पत्रकारांवर संताप व्यक्त करत गोंधळ घालू लागला.
यादरम्यान, त्याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली. तसेच, तिच्या विरोधानंतरही तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पत्रकाराने तात्काळ पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संतोष पंडितविरोधात विनयभंगासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे सोशल मीडिया स्टार्सच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


