Jay Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या संवेदनशील विषयावर आतापर्यंत अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी मौन पाळले असताना, अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. “विलिनीकरणाचा निर्णय ज्येष्ठ नेते घेतील, पण वैयक्तिकरित्या आम्हाला पवार कुटुंब म्हणून एकत्र राहायला आवडेल,” असे भावनिक विधान त्यांनी केले आहे.
राजकारण बाजूला, कुटुंब प्रथम!
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अधिक भाष्य करणे टाळत जय पवार म्हणाले की, “याबाबतची तांत्रिक आणि राजकीय भूमिका सुनेत्रा वहिनी, पार्थ दादा किंवा पक्षातील इतर अनुभवी नेते ठरवतील. मी अजून छोटा आहे. मात्र, कुटुंब म्हणून आम्ही सर्व एकत्र असावे, अशी माझी भावना आहे. आजही आमच्यात संवाद सुरू असतो आणि कठीण प्रसंगात पवार कुटुंब नेहमीच एकत्र उभे राहिले आहे.” विलिनीकरण हा राजकारणाचा भाग असला तरी कौटुंबिक जिव्हाळा कायम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी; जय पवारांचा सूर
बारामतीच्या आगामी पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. “शरद पवार साहेबांचाही हाच आग्रह आहे आणि खुद्द बारामतीकरांनाही निवडणूक नको आहे. अजित दादांनी गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीत जे काम केले आहे, ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकमताने व्हावी, हीच सर्व बारामतीकरांची भावना आहे,” असे ते म्हणाले.
पत्रकार परिषद का टाळली? जय पवारांनी दिले स्पष्टीकरण
विशिष्ट मुद्द्यांवर आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करण्यामागचे कारणही जय पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “मला जे महत्त्वाचे मुद्दे मांडायचे होते, ते रोहित दादांनी (रोहित पवार) आधीच जाहीर केले आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी पुन्हा सांगून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची माझी इच्छा नव्हती. आता जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल. अहवाल आल्यानंतर मी स्वतः सर्व माध्यमांसमोर येऊन स्पष्टता देईन.”


