Beed Crime News : बीड शहरात निवडणुकीनंतर राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेचे पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांनी समर्थकांसह भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपच्या भाग्यश्री देशपांडे यांच्या विजयामुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी त्यांच्या पती सागर देशपांडे यांना सतत लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. रस्त्यात शिवीगाळ करणे, गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्यांना धमक्या दिल्या जात होत्या.
शुक्रवारी रात्री सागर देशपांडे हे घरासमोर फोनवर बोलत असताना जाधव, त्यांचा मुलगा आणि अन्य ५ ते ७ जणांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले असून डोकं, पोट आणि पाठीवर मार लागल्याची माहिती आहे.
हा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, हल्लेखोरांची स्पष्ट दृश्ये समोर आली आहेत.
या प्रकरणी सागर देशपांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बाळासाहेब जाधव, त्यांचा मुलगा आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


