Weather Update : भारतीय हवामान विभागाने देशातील १३ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाने माघार घेतल्याने उष्णतेचा कहर वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये पुढील काही दिवस तापमानात आणखी २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यात हवामान कोरडे राहणार असले तरी उष्ण व दमट वातावरण कायम राहणार आहे.
राज्यात काल अकोला येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच गडचिरोली आणि सोलापूरमध्येही तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. अमरावती, वर्धा आणि परभणी येथे ३९ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले.
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील २ ते ३ दिवसांत तापमान आणखी वाढून ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि शेतकऱ्यांनीही पिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


