Delhi-Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानातील अलवर जिल्ह्यात प्रवासी बस आणि केमिकल टँकर यांच्यात भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना एक्सप्रेसवेवरील चॅनल 100 इंटरचेंज पुलाजवळ घडली. धडक इतकी भीषण होती की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये बस चालक, एक महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि एनएचएआयचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघातानंतर काही काळ एक्सप्रेसवेवर वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप जखमी प्रवाशांनी केला असून त्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग आणि निष्काळजीपणा हे संभाव्य कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.


