Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे खरातला चौथ्या गुन्ह्यात आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे.
याचदरम्यान खरातची सासू पार्वती शिंदे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “अशोक खरात ऑफिसमध्ये जात असे, पण तिथे तो काय करायचा याची मला काहीच माहिती नव्हती.” त्यांनी स्वतःला या प्रकरणाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे सांगितले. तसेच त्याची पत्नी कल्पना खरात कुठे आहे, याचीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कल्पना खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार असून गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांना तिचा शोध लागलेला नाही. तपास पथकाने तिच्या माहेरच्या नातेवाईकांपासून ते मैत्रिणी आणि घरातील कामगारांपर्यंत चौकशी केली, मात्र अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
या प्रकरणात समता पतसंस्थेतील बनावट खात्यांचा मुद्दाही पुढे आला आहे. या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचे नाव समोर आले होते. मात्र त्यांनी ही खाती बनावट असल्याचा दावा करत, आपल्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून खाती उघडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या शिर्डी पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


