Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवार, 17 एप्रिल 2026 पर्यंत राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या काही भागांत उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या आकाश निरभ्र असून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि मुंबई परिसरात दमट हवामानाचा त्रास
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ‘मुंबई महानगर प्रदेशा’मध्ये (MMR) 16 एप्रिल पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण विभागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत दिवसाच्या तापमानात मोठी वाढ अपेक्षित आहे. हवेतील आर्द्रता जास्त असल्यामुळे उकाडा वाढणार असून, येथे कमाल तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कोरडे हवामान
पश्चिम महाराष्ट्रात दिवसा उष्णतेची लाट कायम राहणार असली, तरी सकाळचे हवामान तुलनेने सौम्य असेल. या भागात कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असून दिवसाचे तापमान 37 अंशांवरून 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, तर रात्रीचे तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.
मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार
मराठवाडा विभागात तीव्र उष्णतेची लाट असून हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. येथे कमाल तापमान 39 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भ विभागात होण्याची शक्यता आहे. विदर्भात पारा 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे नागरिकांना उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागेल. येथील किमान तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


