Heat Wave : राज्याला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने कंबर कसली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) इशाऱ्यांचा आधार घेत, प्रशासनाने नागरिकांच्या, विशेषतः उन्हात काम करणाऱ्या श्रमिकांच्या सुरक्षिततेसाठी तीन महत्त्वाच्या मानक कार्यपद्धती (SOPs) लागू केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या नव्या नियमावलीमुळे उष्माघाताचे धोके कमी होऊन कष्टकरी वर्गाला मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या १५ जिल्ह्यांवर विशेष लक्ष
उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, अकोला, जळगाव, लातूर आणि नांदेडसह इतर संवेदनशील जिल्ह्यांचा समावेश आहे.
तीन स्तरांवरील उपाययोजना नेमक्या काय?
१. मैदानी कामगारांसाठी विशेष कवच:
रस्त्यावर काम करणारे फेरीवाले, वाहतूक पोलीस, डिलिव्हरी बॉय आणि बांधकाम मजुरांसाठी पहिली SOP आहे. तापमानानुसार (पिवळा, नारंगी किंवा लाल अलर्ट) कामाच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, ओआरएस (ORS) आणि सावलीची सोय करणे आता बंधनकारक असेल.
२. खाण कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य:
दुसरी SOP विशेषतः चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. खाणींमध्ये थंडावा देणारी विश्रांती केंद्रे, व्हेंटिलेशनची उत्तम सोय आणि महिला कामगारांसाठी स्वतंत्र सुविधांवर भर देण्यात आला आहे. कामगारांना उष्णतेमुळे होणारे आजार ओळखण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
३. उष्णता-प्रतिरोधक घरे (Heat-Resistant Housing):
तिसऱ्या SOP मध्ये भविष्यातील नियोजनावर भर आहे. घरांचे तापमान कमी राखण्यासाठी ‘कूल रूफ’ (थंड छप्पर), गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोकळी हरित क्षेत्रे आणि हवामानाला अनुकूल बांधकाम तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही योजना तात्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यांत राबवली जाईल.
प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर
मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी स्पष्ट केले की, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे राज्यातील काही भागांत पारा ४९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना (म्हाडा, सिडको, महापालिका) या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क:
- जिल्हा नियंत्रण कक्ष: १०७७
- रुग्णवाहिका: १०८
- पोलीस हेल्पलाइन: १००/११२
राज्यातील आरोग्य केंद्रे आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग आता या एसओपींच्या माध्यमातून उष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


