Baramati By-election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक भावनिक वळण पाहायला मिळत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा आमदार रोहित पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटात असूनही रोहित पवारांनी अजित दादांवरील प्रेमाखातर स्वतःला या प्रचारात झोकून दिले असून, काटेवाडीतून त्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला.
सायकल रॅली ते घोंगडी सभा: रोहित पवारांनी जागवल्या आठवणी
प्रचाराचा शुभारंभ करताना रोहित पवार भावूक झाले होते. “लहानपणी मी दादांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढली होती, आज त्यांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा काकींसाठी प्रचार करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, ‘अजित दादांचा पुतण्या आणि त्यांचा चाहता’ म्हणून मी लोकांसमोर आलो आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार साहेबांच्या भूमिकेमुळे निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे रोहित पवारांनी कौतुक केले. ते म्हणाले, मोठ्या राजकीय पक्षांनी पवार परिवाराचा आदर राखत उमेदवार उभे केले नाहीत. काँग्रेसनेही काही अटींवर आपली माघार घेतली, यात साहेबांची भूमिका महत्त्वाची होती. अपक्ष उमेदवारांना एकही मत न देता ९९ टक्के मतदान सुनेत्रा काकींच्या पारड्यात टाकावे, असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले.
प्रशासकीय दरारा आणि दादांची स्टाईल
“अधिकारी आजही सांगतात की, दादांचा फोन येईल असे आम्हाला वाटते,” असे सांगत रोहित पवारांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला. प्रचारासाठी सकाळी ९:३० ची वेळ पाळणे ही दादांचीच शिस्त असल्याचेही त्यांनी मिश्किलपणे नमूद केले. यावेळी त्यांच्यासोबत वडील राजेंद्र पवार आणि बहीण सई पवार यांचीही उपस्थिती होती.
एकच मंच आणि संयुक्त प्रचार?
सर्वात मोठा प्रश्न हा होता की, रोहित पवार आणि जय पवार एकाच मंचावर दिसणार का? यावर बोलताना रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हा केवळ राजकीय प्रचार नसून लोकांच्या गाठीभेटी घेण्याचा एक कौटुंबिक प्रयत्न आहे. पवार परिवारातील सर्व सदस्य सुनेत्रा काकींच्या विजयासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असून, बारामतीकरांना आदेश देण्याची गरज नाही, त्यांना काय करायचे हे पक्के ठाऊक आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


