Bihar New CM: बिहारच्या राजकारणात आज एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. भाजपच्या ४६ वर्षांच्या राजकीय प्रवासात पहिल्यांदाच पक्षाचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदी विराजमान झाला आहे. भाजपचे कणखर नेते सम्राट चौधरी यांनी सकाळी 11:00 वाजता पाटण्यातील ‘लोक भवन’ येथे बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच मित्रपक्ष असलेल्या JDU चे आमदार विजय चौधरी आणि विजेंद्र यादव या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर NDA विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झालेल्या सम्राट चौधरींनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला होता, ज्यावर आज शिक्कामोर्तब झाले.
भाजपचा दीर्घ संघर्ष फळाला; पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद ताब्यात
बिहारच्या राजकारणात भाजप आणि त्याचा पूर्वसुरी ‘जनसंघ’ अनेक दशकांपासून सक्रिय आहे. यापूर्वी दोन वेळा भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, परंतु राजकीय समीकरणांमुळे मुख्यमंत्रीपद नेहमीच नितीश कुमार यांच्याकडे राहिले होते. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा केवळ सर्वाधिक जागाच नव्हे, तर मुख्यमंत्रीपदही भाजपकडे आले आहे. अवघ्या नऊ वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या सम्राट चौधरींनी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अल्पावधीतच पक्षात मोठे स्थान निर्माण केले. 26 वर्षांपूर्वी पहिल्यांदा आमदार बनलेले चौधरी यापूर्वी दोन वेळा उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत होते.
सम्राट चौधरींसमोर आव्हानांचे डोंगर
मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना सम्राट चौधरी यांच्यासमोर दुहेरी आव्हान असणार आहे. एका बाजूला संपूर्ण बिहार राज्याचा विकास आणि प्रशासकीय कारभार सांभाळायचा आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि NDA युतीला एकसंध ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. विशेषतः JDU सोबतची युती टिकवून ठेवत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2014 आणि 2015 च्या राजकीय अनुभवांच्या जोरावर सम्राट चौधरी बिहारला नव्या दिशेने नेणार का, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.


