Pune Airport News : पुणे येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा किरकोळ अपघात झाल्याने धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे विमानसेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली असून, उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
सुदैवाने, या अपघातात विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही नागरी मालमत्तेची हानी झालेली नाही. मात्र, धावपट्टी मोकळी करून सेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे पाच तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे किमान आठ उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले असून ती विमाने सुरत, गोवा, चेन्नई आणि कोयंबतूर येथील विमानतळांकडे वळवण्यात आली.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या घटनेची पुष्टी करत, “विमानातील कर्मचारी सुरक्षित आहेत. धावपट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले असून परिस्थिती लवकर सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,” असे सांगितले.
सध्या धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विमानसेवा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे.


