Chhattisgarh Plane Crash: छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातून विमान अपघाताची एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी येत आहे. नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरासागरहा गावाजवळ असलेल्या रतनपहाली जंगलात एक खासगी चार्टर्ड विमान कोसळले. डोंगराळ भागात उडत असताना विमानाचा ताबा सुटला आणि एका मोठ्या झाडाला धडकून हा अपघात झाला.
डोंगराच्या शिखराला धडक अन् होत्याचे नव्हते झाले
प्राथमिक माहितीनुसार, हे विमान ‘आरा’ टेकड्यांच्या परिसरातून प्रवास करत होते. जमिनीपासून अवघ्या ३० फूट उंचीवर असताना विमानाची धडक आधी डोंगराच्या शिखराला बसली आणि त्यानंतर ते वेगाने झाडावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून अवशेष जंगलात विखुरले गेले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमधून अपघाताची दाहकता स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना
जशपूरचे पोलीस अधीक्षक (SP) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी लाल उमेद सिंग यांच्यासह प्रशासकीय फौजफाटा जंगलाकडे रवाना झाला आहे. “विमान अपघाताची माहिती मिळताच आमची पथके तिकडे निघाली आहेत. सविस्तर तपासणी आणि पंचनाम्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल,” असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
प्रवाशांचा जीव टांगणीला; शोधमोहीम सुरू
विमानात नेमके किती प्रवासी होते आणि वैमानिकांसह कर्मचाऱ्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. अपघातग्रस्त भाग हा अत्यंत दुर्गम आणि घनदाट झाडीचा असल्याने मदत पथकांना विमानाच्या मुख्य अवशेषांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विमानात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात असून, जशपूर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.


