Nashik Conversion Case: नाशिक शहरातील एका नामांकित आयटी कंपनीत (IT Company) घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कंपनीची माजी कर्मचारी निदा खान हिने नाशिक रोड न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आणि अंतरिम दिलासा देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जिल्हा न्यायाधीश के.जी. जोशी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. न्यायालयाने निदा खानला कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे.
वैद्यकीय कारणांचा युक्तिवाद ठरला निष्फळ
सुनावणीदरम्यान निदा खानच्या वकिलांनी ती गर्भवती असल्याचे सांगत वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. सरकारी वकिलांनी संबंधित बीपीओ (BPO) कंपनीने आयोजित केलेल्या सहली आणि ट्रिप्सचे काही फोटो पुराव्यादाखल न्यायालयासमोर सादर केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयीन कार्यवाही गोपनीय ठेवावी, अशी विनंतीही सरकारी पक्षाकडून करण्यात आली आहे. निदा खानवर ‘अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ (Atrocities Act) अंतर्गत गंभीर आरोप लावण्यात आले असून, ठोस पुराव्याअभावी तिला दिलासा मिळू नये, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
पोलीस तपासात निदा खानची भूमिका संशयास्पद
नाशिक पोलिसांच्या मते, या संपूर्ण धर्मांतर रॅकेटमध्ये निदा खान हिने अत्यंत महत्त्वाची आणि सक्रिय भूमिका बजावली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडितांची संख्या मोठी असू शकते. मात्र, भीती आणि सामाजिक दबावापोटी अनेक जण अद्याप समोर येण्यास धजावत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ‘अनुसूचित जाती/जमाती कायद्या’ (SC/ST Act) अंतर्गतही कलमे लावली असल्याने, तांत्रिकदृष्ट्या तिला अटकपूर्व जामीन मिळणे कठीण असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
२७ एप्रिलच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
निदा खानचे वकील राहुल कसलीवाल यांनी सांगितले की, सध्या केवळ अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. मात्र, आता मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर 27 एप्रिल रोजी सविस्तर युक्तिवाद होणार आहे. पोलिसांना आपल्या तपासावर पूर्ण विश्वास असून, निदा खानची पोलीस कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कथित धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत आणि यामध्ये आणखी कोणाचे हात आहेत, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.


