Sunetra Pawar: “अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि त्यांचा विकासाचा वारसा अद्याप जिवंत आहे. मी एका संघर्षयोद्ध्याची पत्नी आहे; स्वराज्यासाठी येसूबाई जशा लढल्या, तशीच मी बारामतीच्या हितासाठी लढेन,” असा वज्रनिर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत बोलताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या.
राजमातांचा आदर्श आणि ‘शिवधनुष्य’
सांगता सभेतील आपल्या भाषणात सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक संदर्भांचा वापर करत मतदारांना साद घातली. त्या म्हणाल्या, “दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण त्यांच्या पश्चात त्यांनी सुरू केलेल्या कामाचे शिवधनुष्य मी आज पेलले आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने मी लोककल्याणकारी कारभार करेन. ही बारामतीची माती माझी आहे आणि येथील जनतेच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”
अजितदादांच्या मृत्यूबाबत संशय; मोदी-शाहांना साकडे
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत जनमानसात असलेल्या शंकांवर भाष्य करताना सुनेत्रा पवार यांनी न्यायाची ग्वाही दिली. “दादांच्या निधनाबाबत तुमच्याप्रमाणेच माझ्याही मनात अनेक प्रश्न आहेत. मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीची विनंती केली आहे. जर काही चुकीचे आढळले, तर गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान करेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सुप्रिया सुळेंची उपस्थिती अन् पवारांचे आभार
या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे महायुतीच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानले. सुप्रिया सुळे यांनीही यावेळी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
मतदानाचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेने बारामतीतील प्रचाराची सांगता झाली. येत्या 23 एप्रिल रोजी बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


